शिरपूर (ता. प्रतिनिधी):
शिरपूर तालुक्यात दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट व कमी वेळेत झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत तालुक्यातील विविध गावांच्या शिवारात उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
त्यात अजनाळ, बभळाज, सावेर, गोदी, तोंदे, हिसाळे, तरडी, भाटपुरा, थाळनेर आदी गावांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतातील पिके जमीनदोस्त झाली.प्राथमिक पाहणीनुसार केळी, पपईसह भाजीपाला व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे.
तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिलेल्या प्राथमिक नुकसानीच्या अहवालानुसार
केळी-७५० हेक्टर, पपई-३१२ हेक्टर,टमाटे- ५५ हेक्टर,टरबूज-२५ हेक्टर,मका-६३० हेक्टर,
रब्बी ज्वारी-११२ हेक्टर,हरभरा-३२० हेक्टर,
गहू-१३२ हेक्टर,उन्हाळी बाजरी-१७ हेक्टर, अशा एकूण २ हजार ३५३ हेक्टर क्षेत्रावरील सुमारे १ हजार ८३० शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.दरम्यान, संयुक्त पंचनामा सुरू असून अंतिम अहवालानुसार नुकसानग्रस्त क्षेत्र व बाधित शेतकरी संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याची माहितीही तहसीलदार माळी यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत असून, तातडीने पंचनामे पूर्ण करून शासनाने त्वरित मदत जाहीर करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.