शिरपूर तालुक्यातील नागेश्वर परिसरात मंगळवार (दि. 27) रोजी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांसह गारपीटीने शेतकऱ्यांच्या आशा उद्ध्वस्त केल्या.
नागेश्वर बंगला, अजनाड, तरडी, हिसाळे आदी शिवारांमध्ये सायंकाळी चारच्या सुमारास वातावरणात झपाट्याने बदल झाला आणि काही मिनिटांतच वादळी वाऱ्यासह अवकाळी गारपीट सुरू झाली. निसर्गाच्या या कोपामुळे मका, रब्बी ज्वारी,हरभरा,केळी यांसारखी पिके अक्षरशः भुईसपाट झाली.तर रस्त्यावर अक्षरशः झाडे कोलमडून पडले.
शेतकऱ्यांनी कर्ज काढून, वाढत्या खत-बियाण्यांच्या किमती सहन करत, रात्रंदिवस राबून उभी केलेली पिके काही क्षणांत नष्ट झाली. गारपिटीच्या माऱ्याने मका व ज्वारी, हरभरे,केळी पपईची झाडे जमीनदोस्त झाली, अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आधीच अवकाळी पाऊस, बाजार भावातील चढउतार, वाढते कर्ज यामुळे शेतकरी अडचणीत असताना, या नैसर्गिक आपत्तीने त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.काही शेतकऱ्यांच्या संपूर्ण शिवारात नुकसान झाले असून पुढील हंगाम कसा काढायचा, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
