शिरपूर (प्रतिनिधी) तालुक्यातील करवंद येथील यात्रोत्सवात आनंद, उत्साह आणि टाळ्यांच्या गजरात सुरू असलेल्या तमाशाच्या कार्यक्रमाला अचानक काळी किनार लागली.नृत्य सादर करून तमाशा स्टेजवरून खाली उतरताच एका माजी तमाशा कलावंताचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.जीभो सोनवणे (रा. रुंदावली) असे मृत कलावंताचे नाव आहे. करवंद येथे यात्रेनिमित्त ‘विद्या शिवानी अमळनेरकर’ यांचा तमाशाचा फड दाखल झाला होता.पूर्वी तमाशा कलावंत म्हणून काम केलेल्या सोनवणे यांनी जुन्या ओळखीच्या जोरावर फडाच्या संचालकांकडे स्टेजवर नृत्य करण्याची इच्छा व्यक्त केली.परवानगी मिळताच त्यांनी प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात नृत्य सुरू केले.मात्र,नृत्य सादरीकरण करून स्टेजवरून खाली उतरताच सोनवणे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि क्षणातच ते स्टेजमागे कोसळले. उपस्थितांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. हृदयविकाराचा तीव्र झटका हे मृत्यूचे प्राथमिक कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
कलेच्या मंचावर, प्रेक्षकांसमोर सादरीकरण करत असतानाच एका माजी तमाशा कलावंताचा असा अंत झाल्याने यात्रेतील वातावरण क्षणात शोकाकुल झाले. या घटनेमुळे तमाशा कलावंतांमध्ये तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.