शिरपूर (प्रतिनिधी)कळमसरे परिसरात दुचाकी चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, घरासमोर उभी असलेली डिलक्स मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही चोरी घरासमोर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून संबंधित फुटेज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
पळासनेर येथील रहिवासी देवा उखा भील यांची MP-46MT-7540 क्रमांकाची डिलक्स दुचाकी 24 जानेवारी रोजी पहाटे पावणे 3 वाजेदरम्यान शिरपूर–कळमसरे येथील त्यांच्या निवासस्थाना समोरून चोरीस गेली. पहाटे उठल्यानंतर मोटारसायकल जागेवर नसल्याचे लक्षात येताच त्यांनी परिसरात शोध घेतला; मात्र दुचाकी आढळून आली नाही.त्यानंतर भील यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, फुटेजच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे. व्हायरल फुटेजमध्ये एक इसम मोटारसायकल चोरी करताना स्पष्ट दिसत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान,शिरपूर व कळमसरे परिसरात अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. रात्रीची पोलिस गस्त वाढवावी आणि चोरीच्या घटनांचा तातडीने छडा लावावा, अशी जोरदार मागणी स्थानिकांनी केली आहे.