शिरपूर/- शहराच्या विविध भागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असल्याने नागरीकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. कुत्र्यांचे टोळके एकत्रीतपणे पादचाऱ्यांवर हल्ले चढविण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरीकांची अडचण लक्षात घेवून तातडीने ठोस उपाययोजना करावी यासाठी शहरातील चंदनआबा फाऊंडेशन व नेताजी युथ फ्रेंड सर्कलतर्फे नगरपालिकेला निवेदन देण्यात आले. उपनगराध्यक्षा सौ. संगीता देवरे व प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनानुसार, सार्वजनिक रस्त्यांसह शहरातील कॉलनी परिसर, गल्ली बोळात भटक्या कुत्र्यांच्या वावर वाढला असून त्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.शाळेत जाणारी लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरीक यांच्यावर अचानकपणे भटकी कुत्री हल्ला करीत असून चावा घेण्याचे प्रमाण वाढले असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपरिषद प्रशासन या गंभीर मुद्यावर लक्ष देत नसल्याने व त्याबाबत कोणतीही उपाय योजना होत नसल्याने नागरीकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. नगरपालिका प्रशासनाने निवेदनाची तातडीने दखल घ्यावी आणि भटक्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करून कायमस्वरुपीची उपाययोजना करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी भरत राजपूत, जयवंत शिरसाठ, डॉ. दिपक गिरासे, राजेंद्र पाटील, शुभम पाटील, मनोज पाटील, नितीन राजपूत, गौरव अनिल कापडी, कवन गिरासे यांच्यासह दोन्ही संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.