मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील सांगवी गावाजवळ सोमवारी १९ जानेवारी दुपारी अडीच ते 3 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. गतिरोधकावर अचानक धीम्या झालेल्या वाहनाला भरधाव दुचाकीने मागून धडक दिल्याने झालेल्या या अपघातात 3 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.
या अपघातात अजय नांदल्या पावरा वय 3 याचा मृत्यू झाला.तर नांदल्या रेल्या पावरा वय 40 रोमा नांदल्या पावरा वय 30 निर्मला नांदल्या पावरा वय 9, आणि वनीता नांदल्या पावरा वय 6 सर्व रा. रेताई, ता. सेंधवा, जि. बडवणी हे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदल्या पावरा हे आपल्या कुटुंबासह दुचाकीवरून सेंधवाकडून शिरपूरकडे येत होते. सांगवी गावाजवळील गतिरोधकावर पुढे चालणाऱ्या वाहनाच्या चालकाने अचानक वाहनाचा वेग कमी केला. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती वाहनास मागून धडकली. या धडकेत दुचाकीवरील सर्वजण जखमी झाले.जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी अजय नांदल्या पावरा या तीन वर्षीय बालकास मृत घोषित केले. उर्वरित जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताबाबत पुढील तपास तालुका पोलिसांकडून सुरू आहे.