शिरपूर शहरातील आर.सी. पटेल कॉलेजच्या फार्मसी ग्राऊंडवर जिल्हास्तरीय दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १७ जानेवारी) सकाळी ११ वाजता मोठ्या उत्साहात पार पडले. उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान आमदार काशिराम पावरा यांनी भूषविले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयाचे संचालक अशोक गाडेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनपूर्वी सकाळी ९ वाजता आर.सी. पटेल कॉलेजच्या मुख्य इमारतीपासून सवाद्य, सांस्कृतिक वातावरणात ग्रंथदिंडी काढण्यात आली. या दिंडीत विद्यार्थी, शिक्षक, ग्रंथप्रेमी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० अन्वये उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय, धुळे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि शिरपूर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून नाशिक विभागात प्रथमच शिरपूर येथे जिल्हास्तरीय ग्रंथोत्सव साजरा होत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात दोन पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.वाचनसंस्कृती वृद्धिंगत करणे, नव्या पिढीला पुस्तकांकडे आकर्षित करणे आणि ज्ञानप्रसाराला चालना देणे हा या ग्रंथोत्सवाचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
उद्घाटन सोहळ्यास धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.तुषार रंधे,शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी,सचिव रेशा पटेल,नगरपालिकेच्या उपाध्यक्षा संगीता देवरे,धुळे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयचे अधिकारी जगदीश पाटील,सहाय्यक ग्रंथालय संचालक नाशिकचे सचिन जोपुडे,जिल्हा ग्रंथालय कार्यालय आणि संघाचे अधिकारी- पदाधिकारी विविध शैक्षणिक संस्था प्रमुख, साहित्यिक, शिक्षक, विद्यार्थी, ग्रंथप्रेमी नागरिक तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.