शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या बँक ऑफ बडोदा शाखेच्या एटीएम मशीनची चोरी करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. ही घटना १७ रोजी पहाटे सुमारे अडीच ते तीन वाजेदरम्यान घडली.या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास पिकअप वाहनातून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून ते चोरण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान शहरात रात्रीची गस्त घालत असलेल्या पोलिस पथकाला संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांना पाहताच चोरट्यांनी एटीएम मशीन तिथेच सोडून वाहनासह पलायन केले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता चोरट्यांनी चोपडा रस्त्यावरील गोदी परिसरात वाहन केळीच्या शेतात घालून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
या कारवाईत पोलिसांनी पिकअप वाहन ताब्यात घेतले असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.,परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.