शिरपूर : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे व शिरपूर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे ग्रंथोत्सव–२०२५ या भव्य साहित्यिक उपक्रमाचे आयोजन आर. सी. पटेल फार्मसी कॅम्पस, शिरपूर येथे दि. १७ व १८ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे.
ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून धुळे खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, नंदुरबार खासदार ॲड. गोवाल पाडवी यांच्यासह आमदार काशिराम दादा पावरा, किशोर दराडे, मंजुळाताई गावित, अनुप अग्रवाल, राघवेंद्र पाटील, सत्यजित तांबे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषद सीईओ अजीज करीम शेख, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
दि. १७ जानेवारी रोजी ग्रंथोत्सवाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार असून आर. सी. पटेल मेन बिल्डिंग येथून ग्रंथदिंडी निघणार आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष चिंतनभाई अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होईल. सकाळी ११ वाजता मुख्य उद्घाटन कार्यक्रमानंतर धुळे जिल्ह्यातील आदर्श ग्रंथपाल व उत्कृष्ट वाचकांचा सत्कार तसेच पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. दोन दिवसीय कार्यक्रमात पहिल्या दिवशी
“अहिल्याबाई होळकर” : इतिहास, साहित्य आणि लोककल्याणाचा आदर्श” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात प्रा. डॉ.सदाशिव सूर्यवंशी, प्रा.डॉ.बी.एन.पाटील व लेखिका दर्शना पवार सहभागी होणार असून अध्यक्षस्थान प्रा. डॉ. फुला बागुल भूषविणार आहेत. दुपारी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
दुसऱ्या दिवशी १८ जानेवारी रोजी सकाळी “एआय युगातील वाचन-सवय आणि समज” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यानंतर कथाकथन सत्र, बहुभाषिक कवी संमेलन “क-कवितेचा” तसेच समारोप सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी साहित्यप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील यांनी केले आहे. ग्रंथोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शिरपूर एज्युकेशन सोसायटी व ग्रंथोत्सव समन्वय समितीचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.