शिरपूर : तालुक्यातील हाडाखेड येथे असलेल्या सीमा तपासणी नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करत मोठा मद्यसाठा पकडला. या कारवाईत देशी दारूने भरलेली इको कार जप्त करण्यात आली असून एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
शिरपूर–सेंधवा रस्त्यावर गुरुवारी (दि. ८) राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक देवीदास नेहुल व त्यांचे पथक गस्त घालत असताना एका वाहनातून अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार हाडाखेड सीमा नाक्यावर नाकाबंदी करून संशयित इको कार (एमपी ०९–८२६०) अडविण्यात आली.वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारूची ३० खोकी आढळून आली. या खोकींमध्ये ९० मिलीच्या सुमारे ३ हजार बाटल्या होत्या. जप्त केलेल्या दारूची किंमत अंदाजे १ लाख २० हजार रुपये असून वाहनाची किंमत ५ लाख रुपये आहे.या प्रकरणी सुरेश ऐशराम बारेला (रा. आमोदे, ता. शिरपूर) याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई निरीक्षक देवीदास नेहुल, ए. पी. मते, संतोष निकम व त्यांच्या पथकाने केली.