शिरपूर :- महिला व युवतींना क्रीडा क्षेत्रात समान संधी, आत्मविश्वास व नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट,एस.व्ही.के.एम.एन.एम. आय.एम.एस.तसेच शिरपूर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय ‘अस्तित्व’ वुमेन्स क्रिकेट चॅम्पियनशीपचे 18 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत भव्य आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या डायरेक्टर सौ.द्वेता करण नथवाणी यांच्या संकल्पनेतून साकारली असून, ग्रामीण व शहरी भागातील महिला आणि युवतींना क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील क्रीडागुणांना चालना देणे व संघभावना वाढविणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.या चार दिवशीय स्पर्धेचे उद्घाटन सोहळा रविवार,18 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता आर. सी.पटेल फार्मसी कॉलेज ग्राउंड, करवंद नाका, शिरपूर येथे होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, सौ. कृतीबेन भूपेशभाई पटेल व अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून स्पर्धेचे उद्घाटन करणार आहेत.ही स्पर्धा 18 ते 21 जानेवारी दरम्यान शिरपूर शहरासह तालुक्यातील विविध गावांमधील महिला क्रिकेट संघांमध्ये सामने रंगणार असून, या कालावधीत महिला क्रिकेटपटूंच्या कौशल्याचा, चिकाटीचा व संघभावनेचा प्रत्यय येणार आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेत सुमारे 400 महिला व युवती क्रिकेटपटूंनी उत्साहात सहभाग नोंदवला होता.यंदाही मोठ्या संख्येने संघ सहभागी होणार असून, स्पर्धेला अधिक व्यापक व स्पर्धात्मक स्वरूप प्राप्त झाले आहे.या वुमेन्स क्रिकेट चॅम्पियनशीपमध्ये प्रथम बक्षीस 71 हजार रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय बक्षीस 51 हजार रुपये रोख व ट्रॉफी, तृतीय बक्षीस 31 हजार रुपये व ट्रॉफी यासोबतच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, सामनावीर व मालिकावीर यांसाठी वैयक्तिक स्वरूपातील पारितोषिके, ट्रॉफी व प्रमाणपत्रे देऊन महिला क्रिकेटपटूंना सन्मानित करण्यात येणार आहे.
चार दिवसांच्या चुरशीच्या सामन्यांनंतर बुधवार, 21 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता आर. सी. पटेल फार्मसी ग्राउंड, करवंद नाका, शिरपूर येथे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे.या कार्यक्रमास क्रीडा, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून सौ. द्वेता करण नथवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी नियमितपणे वुमेन्स क्रिकेट चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे शिरपूर शहर व तालुक्यातील महिला व युवतींना आपली क्रीडा क्षमता दाखविण्याची, आत्मविश्वास वाढविण्याची व पुढील स्तरावरील स्पर्धांसाठी तयार होण्याची संधी मिळत आहे.या स्पर्धेत मोठ्या संख्येने महिला व युवती यांनी 10 जानेवारी पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.