शिरपूर (प्रतिनिधी) : शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांची श्री शनी मंदिर, शिरपूर ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री शनी मंदिर ट्रस्टतर्फे विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात शनी मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष तसेच भाजपा धुळे ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या हस्ते भूपेशभाई पटेल यांचा शाल, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
श्री शनी मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून मंदिराच्या व्यवस्थापनात पारदर्शकता, शिस्त व विकासात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात भूपेशभाई पटेल यांनी केलेल्या विविध विकासकामांची दखल घेऊन त्यांच्यावर ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ट्रस्टचे कार्य अधिक गतिमान होईल,असा विश्वास बबनराव चौधरी यांनी सत्कार प्रसंगी व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.यावेळी नवनियुक्त अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी आपल्या मनोगतात श्री शनी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी, भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच ट्रस्टच्या कामकाजात पारदर्शकता राखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करण्याचे आश्वासन दिले आणि उपस्थितांचे आभार मानले.या प्रसंगी श्री शनी मंदिर ट्रस्टचे सचिव राजेंद्र पाटील, विश्वस्त नरेंद्र पाटील यांच्यासह ट्रस्टचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.