क्राइम ब्लास्ट ब्यूरो
तालुक्यातील दहिवद येथे भांडणाची कुरापत काढून मारहाण करुन युवकाचा खून केल्याच्या संशयावरुन गावातीलच दुसर्या युवकाला सांगवी पोलिसांनी अटक केली. उमेश तथा दादू विश्वनाथ चव्हाण (रा.दहिवद) असे संशयिताचे नाव असून त्याने दहिवद गावाजवळ विश्व मानव रुहानी केंद्राजवळ 19 ऑगस्टला सायंकाळी विनायक तथा बारकू काशीनाथ पाटील (वय 37, रा.दहिवद) याचा खून केल्याचा संशय आहे.
19 ऑगस्टला सायंकाळी विनायकचा मृतदेह आढळला होता. त्याच्या अंगावरील जखमांमुळे त्याचा मृत्यू नैसर्गिक नसून घातपाती असल्याचा संशय नातलगांनी व्यक्त केला. दरम्यान 20 ऑगस्टला विनायकचा चुलतभाऊ चुनीलाल जगन्नाथ पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित उमेश चव्हाण याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली.
फिर्यादीनुसार, विनायक आणि संशयित उमेश यांच्यात 17 ऑगस्टला रात्री साडेअकराला वाद झाला होता. त्यात विनायकला उमेशने बेदम मारहाण केली होती. या वादातूनच उमेशने 19 ऑगस्टला सायंकाळी साडेपाचपूर्वी तोंडावर व छातीवर जबर मारहाण करुन ठार केले असे फिर्यादीत म्हटले आहे.