क्राइम ब्लास्ट ब्यूरो
तालुक्यातील दहिवद येथे आठ वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आदिवासी संघटना, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व महिलांनी आज डीवायएसपी कार्यालयावर विराट निषेध मोर्चा काढला.
यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
शहरातील चोपडा जीन येथून सकाळी साडेदहाला मोर्चास सुरुवात झाली. मेन रोडने मोर्चा न्यायालय परिसर व तेथून डीवायएसपी कार्यालयाच्या प्रांगणात नेण्यात आला. तेथे मोर्चेकऱ्यांनी ठिय्या दिला. आमदार काशीराम पावरा, भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा धरती देवरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तुषार रंधे, माजी नगराध्यक्षा संगीता देवरे, पंचायत समितीच्या माजी उपसभापती कल्पना कोळी, एड. शालिनी सोनवणे, बाजार समितीचे सभापती के. डी.पाटील आदींच्या उपस्थितीत आदिवासी युवती, मुलीनी प्रातिनिधिक स्वरूपात प्रांताधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी, डीवायएसपी सुनील गोसावी यांना निवेदन दिले. त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांतर्फेही निवेदने देण्यात आली.
आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याचे कृत्य घृणास्पद असून त्यामुळे जनतेमध्ये संताप पसरला आहे. संशयिताला अटक करण्यात आली असली तरी त्यावर फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मोर्चेकर्यांनी निवेदनातून केली. आदिवासी महिलांतर्फे तीव्र आक्रोश करण्यात आला. यावेळी शिरपूर शहर आणि सांगवी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यावर चाकूने वार
मोर्चा आटोपून निघालेल्या जमावातील एक गट शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स येथे रस्ता अडवून धुडगूस घालत होता त्याला अटकाव करण्यासाठी सांगवी पोलिसांचे पथक पोहोचले. मात्र जमावाने त्यांच्याशी अरेरावी केली. यावेळी निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन संशयिताने सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पाठीवर चाकूने वार केला. त्यात ते जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. संशयित हल्लेखोर जगन सतीश भिल यांच्यासह काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांनी शिरपूरला भेट देऊन तपासाचे निर्देश दिले.