क्राइम ब्लास्ट ब्यूरो
आठ वर्षीय बालिकेवर नराधम युवकाने अत्याचार केल्याची घटना 15 ऑगस्टला दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास दहिवद गावाजवळ साखर कारखाना परिसरात घडली. संशयित युवकाला पोलिसांनी तातडीने अटक केली.

अनिल केरबा काळे (वय 28) असे संशयित युवकाचे नाव असून तो साखर कारखाना परिसरातील रहिवासी आहे. मुंबई आग्रा महामार्गजवळ कारखान्यासमोर त्याचे हॉटेल आहे. 15 ऑगस्टला दुपारी त्याने परिसरातील एक आठ वर्षीय मुलीस उचलून नेऊन जवळच्या टेकड्यांमध्ये जाऊन तिच्यावर अत्याचार केला. ही बाब लक्षात येताच परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पोलिसांनी तातडीने हालचाली करीत संशयित युवकाला अटक केली. संतप्त जमावाने त्याच्या हॉटेलची तोडफोड केली. 15 ऑगस्टला सायंकाळी सांगवी येथे आलेले पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन देऊन संशयितावर फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.