क्राईम ब्लास्ट ब्यूरो
काकाच्या स्कूटीवर पेट्रोल टाकून पुतण्याने ती पेटवून दिल्याची खळबळजनक घटना दोंडाईचा शहरात घडली. संशयित पुतण्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दोंडाईचा शहरात चैतन्य कॉलनीमध्ये निलेश आगरचंद जैन (वय 45) यांचे घर आहे. ते हेल्थ इन्शुरन्स एजंट म्हणून काम करतात. 8 मे रोजी रात्री जेवण करून ते झोपी गेले. मध्यरात्री अडीचला त्यांना मोठ्या आवाजाने जाग आली. त्यांनी बाहेर जाऊन पाहिले असता कंपाऊंडमध्ये लावलेली त्यांची स्कूटी पेटलेली दिसली. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने आग विझवली.
आगीचे कारण समजून घेण्यासाठी जैन यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांचा पुतण्या हिरेश संदीप जैन हा स्कूटीवर पेट्रोल टाकून व पेटवून देऊन पळून गेल्याचे त्यात दिसून आले. निलेश जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित हिरेश जैन (रा.लक्ष्मी कॉलनी, दोंडाईचा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.