संदीप जमादार
क्राइम ब्लास्ट ब्यूरो
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार दिल्यामुळे नाराज होऊन पक्षापासून दुरावलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष डॉ.मनोज उत्तमराव महाजन यांनी अखेर तीन मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत पत्नी तथा विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ.अमृताताई महाजन यांनीही प्रवेश केला. दोघांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले.
महाजन दांपत्याच्या स्वागतासाठी ना.अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, सचिव आ.शिवाजीराव गर्जे, माजी मंत्री आमदार अनिल पाटील, प्रवक्ते आ.अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, ज्येष्ठ नेते किरण शिंदे, किरण पाटील, तालुकाध्यक्ष बाळकृष्ण पाटील, शहराध्यक्ष युवराज राजपूत, युवक जिल्हाध्यक्ष सुमित पवार आदि उपस्थित होते.
डॉ.मनोज महाजन जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, किसान ज्ञानोदय मंडळ संस्थेचे संचालक आदि विविध पदांवर कार्यरत आहेत. कोरोना संक्रमण कालावधीत त्यांनी शिरपूर व परिसरात होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आरोग्य शिबिरांची मालिका राबवली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे त्यांनी सक्रीय भूमिका घेऊन विविध निवडणुका लढवल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीने राकाँच्या उमेदवाराला संधी देण्याची मागणी लावून धरली होती. मात्र महाविकास आघाडीने अचानक भारतीय कम्युनिस्ट पक्षाला उमेदवारी दिल्यामुळे डॉ.महाजन नाराज होते. त्यानंतर ते पक्षकार्यापासून अलिप्त झाल्यामुळे त्यांच्या पक्षबदलाचा अंदाज वर्तवण्यात येत होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रवेश देतेवेळी विविध विषयांवर डॉ.महाजन यांच्याशी चर्चा केली.