उत्तर महाराष्ट्रात अत्यंत वेगाने विकसित होणारे शहर म्हणून शिरपूरची ख्याती आहे. उत्तम सोयी सुविधांमुळे बाहेरगावचे लोक रहिवास करण्यासाठी शिरपूरला पसंती देतात. त्यामुळे येथील प्लॉटिंगचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात बहरला आहे. या पार्श्वभूमीवर बरेच व्यावसायिक शेती विकत घेऊन नंतर त्यांचे बिगर शेतीकडे रूपांतर करून प्लॉट तयार करण्याच्या व्यवसायात सहभागी झाले आहेत.
प्लॉट पाडून जमीन विकण्याच्या या व्यवसायाला मात्र काही अनिष्ट वृत्तीनी ग्रहण लावले आहे. आधी जमीन विकायची मग शासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत करून तिच्या कब्जे उपभोगात अडथळा आणायचा आणि गुंतवणूकदारांकडून जास्तीचा पैसा लुटायचा असे निर्लज्ज धंदे सुरू झाले आहेत.
जमीन विक्रीचा व्यवहार ठरला, खरेदीखत झाले, मोबदला देऊन पूर्ण झाला आणि जमिनीची मालकी हस्तांतरीत झाली तरी प्रत्यक्ष पीक पाहणीवर मात्र मूळ मालकाचे किंवा त्याच्याशी संबंधित व्यक्तीचे नाव लावण्यात येत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. या कामात विशेष तज्ज्ञ असलेल्या महसूल अधिकाऱ्याची अशा लुबाडणूक दारांमध्ये चलती आहे. त्यामुळे जमिनिसंदर्भात इतर प्रक्रिया करतांना अनेक अडचणी येतात. पीक पाहणी संदर्भातील अडचण दूर करण्यासाठी म्हणजेच स्वतःचे नाव कमी करून घेण्यासाठी संबंधित व्यक्तीकडून अव्वाच्या सव्वा रकमेची मागणी केली जाते. त्यामुळे जमीन खरेदीदाराची अक्षरशा लूट होत आहे. झक मारली आणि शिरपुरा जमीन खरेदी केली अशी उदवेगजनक प्रतिक्रिया त्यांच्या मधून व्यक्त केले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिरपुरात जमीन घेताना खूप काळजी घ्या व महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यापासून दूर राहा याची दक्षता घेण्याची गरज आहे.