क्राइम ब्लास्ट ब्यूरो
घराचा आधारस्तंभ असलेल्या युवकाला भोवळ आली. तो रस्त्यावर पडला आणि त्याने मान टाकली ती कायमचीच ! या दुर्देवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
भाविन अनिल भदाणे (वय 28) या युवकाचा ऐन तारुण्यात अत्यंत शोककारक मृत्यू झाला. तो शिरपूर तालुक्यातील तर्हाडी गावाचा रहिवासी होता. सहा सप्टेंबरला सकाळी तो मित्रांसोबत गप्पागोष्टी करत गावाच्या बसथांब्याजवळ उभा होता. सकाळी साडेदहाला भोवळ येऊन तो खाली कोसळला. त्याला नातलग आणि मित्रांनी तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय तपासणीत त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. रक्तदाब अचानक कमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
भाविन शेती करुन चरितार्थ चालवत होता. वर्षभरापूर्वीच भाविनचा विवाह झाला असून त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.