संदीप जमादार-क्राईम ब्लास्ट ब्यूरो

मी शिरपूरचा आणि शिरपूर माझे.. असा बाणा जोपासणाऱ्या भूपेशभाई पटेल यांचा आज वाढदिवस !
महाराष्ट्र मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या या आदिवासीबहुल तालुक्यात चिमुकले शिरपूर शहर ! या शहरात रसिकलाल पटेल तथा पप्पाजी यांचा प्रवेश झाला. त्यांनी हे गाव आपलं मानलं आणि या गावाने त्यांना सहर्ष स्वीकारले. अल्पावधीतच आपल्या दानशूरतेने पप्पाजींनी पंचक्रोशीत ख्याती संपादन केली. स्वकष्टाने व्यवसाय नावारूपाला आणला.
त्यांनी लावलेल्या रोपट्याला त्यांच्या तिन्ही सुपुत्रांनी जणू वटवृक्ष बनवण्याचा चंग बांधला. व्यापार व्यवसाय या माध्यमातून प्रचंड यश मिळवित तिघेही बंधू स्थिरावले. वडिलांकडून हक्काने आणि वारशाने समाजसेवा त्यांच्यापर्यंत झिरपली होती. त्यामुळे एकेक करून अमरीशभाई, मुकेशभाई आणि 2011 मध्ये भूपेशभाई यांचा राजकारणात प्रवेश झाला.
या तिन्ही बंधूंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी राजकारण हे सत्तेचे माध्यम न मानता सेवेचे माध्यम मानले. कदाचित त्यामुळेच ज्या शहरात त्यांचे एकुलते एक घर आहे, त्या शहरावर आणि तालुक्यावर गेल्या 35 वर्षापेक्षा अधिक काळ ते प्रभाव रखून आहेत.
त्यापैकी भूपेशभाई म्हणजे शिरपूरच्या जिव्हाळ्याचा विषय ! खरे तर स्वतःला नेता म्हणून घेणे त्यांना आवडत नाही. ते नेहमी म्हणतात की, मला ओढून ताणून राजकारणात आणले गेले आहे. मात्र जे घडले ते शिरपूरच्या भल्यासाठी ! कारण भूपेशभाईंच्या हातून जो कार्याचा डोंगर उभा राहिला, ते पाहिले तर त्यांना राजकारणात आणण्याचा अमरीशभाई पटेल यांचा निर्णय किती दूरदृष्टीचा होता ते सहजच लक्षात येते.
शिरपूर शहरासाठी भूपेशभाईनी काय केले नाही ? महानगराच्या तोडीचे रूप या शहराला प्राप्त करून दिले. पण केवळ शिरपूर शहरापुरता त्यांचा कर्तुत्वाचा आवाका मर्यादित नाही. संपूर्ण तालुकाभरात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे मळे त्यांनी फुलवले. खेडोपाडी मंदिरे बांधून ईश्वर भक्तीचा जागर त्यांनी केला. बंधाऱ्याचे काम करताना त्यातील सुपीक माती खडकाळ जमिनीवर टाकून ती लागवडीखाली आणली. सुपीक जमीन आणि बारमाही पाण्याचा स्त्रोत यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीला भाव आला. वर्षातून तीन पिके घेण्याची सोय उपलब्ध झाली. एका प्रकारे दुर्गम भागातील शेतकऱ्यांचे आयुष्य बदलून टाकण्याचे पुण्य भुपेशभाईंनी केले.
वैद्यकीय सेवा हा भूपेशभाईंच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय ! कोणीही रुग्ण दिसला की त्यांच्या मनात कालवाकालव होते. मग तो शिरपूरचा असो की बाहेर गावचा, ते लगेचच कामाला लागतात. रुग्णाला मुंबई येथील नामांकित रुग्णालयात पाठवून त्याच्यावर उपचार, प्रसंगी शस्त्रक्रिया करून घेणे, त्याच्या निवासाची व सोबत आलेल्या नातेवाईकांचीही सोय करणे आणि शिरपूर ते मुंबई व मुंबई ते शिरपूर या प्रवासाची सुविधा करून देणे हे सर्व काम पदरमोड करून ते करीत असतात. आजवर कोट्यावधी रुपये रुग्णसेवेवर त्यांनी खर्च केले आहेत आणि हे काम अखंड सुरू राहावे म्हणून एसव्हीकेएम संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील खर्दे येथे तपनभाई पटेल स्मृति रुग्णालयाची उभारणी ते करीत आहेत. या माध्यमातून शिरपूरकरांसाठी आरोग्य सेवेचे खूप मोठे दालन उभे राहणार असून तेथे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारासह विविध गंभीर विकारांवरील उपचारांची सोय सुविधा उपलब्ध होणार आहे.
शिरपूर तालुक्याची ख्याती यापूर्वी पाण्यामुळे होती, शिरपूर पॅटर्न बंधाऱ्यांमुळे होती आता ती रुग्णसेवेच्या या अद्ययावत दालनामुळे असणार आहे .या आणि अशा अनेक लोकांच्या उपयोगी पडणाऱ्या कार्याचे सूत्रधार असणारे जननायक भूपेशभाई पटेल यांना जनसेवेसाठी उदंड आयुष्य लाभो हीच प्रभू चरणी प्रार्थना !