क्राईम ब्लास्ट ब्यूरो
युवतीचा तिच्या लग्नाच्या तिसर्याच दिवशी चाकूने गळा कापून निघृण खून गेल्याच्या गुन्ह्यात संशयित खुनी नरेंद्र एकनाथ भदाणे उर्फ पप्पू शेटे याला धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
शिरपूर तालुक्यातील जातोडा येथील रहिवासी रेणुका धनगर हिचा 25 मार्च 2019 रोजी सकाळी पावणेदहाला शिरपूर फाट्यावरील संगीता लॉन्समधील रुम नं.109 मध्ये गळा चिरुन खून झाला होता. या प्रकरणात संशयित म्हणून नरेंद्र एकनाथ भदाणे उर्फ पप्पू शेटे याला अटक करण्यात आली होती.
खुनाच्या दोन दिवसापूर्वीच म्हणजे 23 मार्चला रेणुकाचा विवाह झाला होता. त्यानंतर ती माहेरी आली होती. 25 मार्चला सकाळी आठला चहा पिऊन येते असे घरी सांगून ती निघून गेली होती. तिचा मोबाईलही घरी राहिला होता. संशयिताने तिला मोटारसायकलवर बसवून संगीता लॉन्समध्ये नेले. तेथे तिच्यासोबत फोटो काढला. त्यानंतर सोबत आणलेल्या चाकूने तिचा गळा कापला. तिच्या मृतदेहाचेही संशयिताने फोटो काढले. त्यानंतर सकाळी साडेअकराला तिच्या मोबाईलवर फोन करुन त्याने मी पप्पू शेटे बोलत असून मी रेणुकाला मारुन टाकले असे सांगितले. संशयिताला खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.
तत्कालीन पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी गुन्ह्याचा कसून तपास करुन साक्षीपुरावे उभे केले. हा संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर अवलंबून होता. त्यातील महत्त्वाची साक्षीदार असलेल्या महिलेचे कोविडमुळे निधन झाले. दोन साक्षीदार उलटले. मात्र मोबाईलमध्ये रेणुकाच्या मृत्यूपूर्वी सोबत काढलेले छायाचित्र, रक्ताचे डाग असलेला शर्ट हा महत्त्वाचा पुरावा ठरला. सरकारी वकिल अॅड.देवेंद्रसिंह तंवर यांचा प्रभावी युक्तिवाद यशस्वी ठरुन सत्र न्यायाधीश ए.एच.सय्यद यांनी संशयिताला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, हवालदार ललित पाटील, रवींद्र माळी व पोलिस नाईक तुकाराम गवळी यांनी केला.