क्राइम ब्लास्ट ब्यूरो
मुंबई-आग्रा महामार्गावर 27 एप्रिलला टँकरमधून मद्यार्क (ब्लेंड) काढून हेराफेरी करीत असतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक येथील भरारी पथकाने छापा टाकला. या कारवाईत दोन जणांना अटक केली असून 52 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सांगवी शिवारातील हॉटेल ओमसाई शेजारी हा गैरप्रकार सुरु होता. हायवेवर गस्त घालणार्या भरारी पथकाला संशय आल्याने त्यांनी छापा टाकला. या कारवाईत रामेश्वर उर्फ पप्पू कैलास गायकवाड (वय 32, रा.सांगवी) व टँकरचालक रामजीवन फुलसिंह मीना (वय 35, रा.कानेड ता.बिओरा जि.राजघर, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान टँकर, महिंद्रा कार व महिंद्रा पिकअप अशा वाहनांसह 35 हजार लिटर तयार मद्यार्क असा एकूण 52 लाख 10 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण, उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथील भरारी पथकाचे निरीक्षक ए.एस.चव्हाण, दुय्यम निरीक्षक व्ही.एस.पाटील, ए.जी.सराफ, जवान गोकुळे शिंदे, विठ्ठल हाके, युवराज रतवेकर, भाऊसाहेब घुले यांनी ही कारवाई केली.