क्राइम ब्लास्ट ब्यूरो
मध्यप्रदेश-महाराष्ट्राच्या सीमावर्ती प्रदेशात उगवलेला गांजा बारामतीला घेऊन जाण्याचा प्रयत्न शिरपूर शहर पोलिसांनी हाणून पडला. 21 मार्चला सायंकाळी दोन जणांना अटक करुन त्यांच्याकडून पावणेदोन लाख रुपयांचा गांजा आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली.
सातपुड्याच्या डोंगराळ भागात पिकवलेल्या गांजा दर्जेदार मानला जात असून महानगरांमधील गंजेडी व अन्य घटकांकडून त्याला मोठी मागणी असते. मुंबई, पुणे यासारख्या महानगरातून गांजा खरेदीसाठी आलेल्या अनेकांना पोलिसांनी कारवाईचा बडगा दाखवला आहे. मात्र तरीही अशा घटना अधूनमधून घडत असतात.
शिरपूर फाट्यावर गांजाची खरेदी करण्यासाठी संशयित येणार असल्याची माहिती पीआय ए.एस.आगरकर यांनी मिळाली होती. त्यांनी शिरपूर फाट्यावर टेहळणी सुरु केली. सायंकाळी महालक्ष्मी हॉटेलसमोर दोघांना संशयावरुन हटकले. त्यांच्याकडे गोणपाटात भरलेला उग्र वासाचा गांजा आढळला. त्यामुळे संशयितांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
दोघांची चौकशी केली असता खरेदीदार विजय ज्ञानदेव बिंबे (वय 34) असून तो शिरसफळ (ता.बारामती जि.पुणे) येथील रहिवासी तर गांजा विक्रीसाठी आलेला इलमसिंह कदरसिंह आखडे (वय 21) असून तो झापडीपाडा (सेंधवा जि.बडवानी, मध्यप्रदेश) येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. दोघांकडून गांजा, मोबाईल, मोटारसायकल असा एकूण एक लाख 69 हजार 80 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एसपी संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अन्साराम आगरकर, उपनिरीक्षक गणेश कुटे, संदीप मुरकुटे, हवालदार ललित पाटील, पोलिस नाईक मनोज पाटील, गोविंद कोळी, विनोद आखडमल, सचिन वाघ, प्रशांत पवार, प्रविण गोसावी, मुकेश पावरा, भटू साळुंखे, कैलास चौधरी, भूषण कोळी आदिंनी ही कारवाई केली.