क्राइम ब्लास्ट ब्यूरो
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हाडाखेड येथील चेक पोस्टवर मारूती इर्टिगा कारमधून तलवारी, गुप्त्या, चॉपर, चाकू, फाईट आदि अवैध शस्त्रांचा साठा सांगवी पोलिसांनी 23 फेब्रुवारीला दुपारी जप्त केला. शस्त्रांची अवैध तस्करी केल्याच्या संशयावरुन दहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयित धुळे व परिसरातील रहिवासी आहेत.
धुळ्यात जणू युद्ध सुरु करायचे असल्याच्या थाटात संशयितांनी हा शस्त्रसाठा आणला होता. मारुती सुझुकी इर्टिगा कार क्रमांक एमएच 04 एफझेड 2004 मधून शस्त्रांची वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळाल्याने सहायक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाट यांनी हाडाखेड चेक पोस्टवर सापळा रचला. संशयित वाहन दिसल्यावर थांबवण्यात आले. त्याची झडती घेतली असता 12 लोखंडी तलवारी, दोन लोखंडी गुप्त्या, एक चॉपर, एक बटन घडीचा चाकू, दोन लोखंडी फाईट अशा शस्त्रांचा साठा आढळला. संशयित सतपाल सोनवणे, किरण दुधेकर, विकास ठाकरे, सखाराम पवार, सचिन सोनवणे, राजू पवार, विशाल ठाकरे, संतोष पाटील, अमोल चव्हाण, विठ्ठल सोनवणे यांचा समावेश आहे. कारसह जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सहा लाख 29 हजार 100 रुपये आहे.