क्राइम ब्लास्ट ब्यूरो
अवैध सावकारी करणार्यांकडून सातत्याने छळ होत असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शिरपुरात घडली आहे. विश्वजित विनोद राठोड असे या 17 वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने 26 जानेवारीला सावळदे येथील पुलावरुन तापी नदीत उडी टाकून जीवनयात्रा संपवली.
विश्वजीत मांडळ शिवारातील साईबाबा अपार्टमेंटसमोरच्या परिसरात राहत होता. त्याचे वडील औरंगाबाद जिल्ह्यात शिक्षक आहेत. शहरातील एका महाविद्यालयात तो अकरावीच्या वर्गात शिकत होता. 26 जानेवारीला दुपारी दोन जण त्याच्या घरी गेले. त्यांनी पैशांवरुन विश्वजीतशी वाद घातला. त्यानंतर संतापाच्या घरात तो मोटारसायकल घेऊन घरातून निघून गेला. कुटुंबिय त्याचा शोध घेत असतांना सायंकाळी साडेसहाला तापी नदीवरील पुलावर त्याची मोटारसायकल उभी दिसली. त्यामुळे नदीपात्रात त्याचा शोध सुरु झाला. 27 जानेवारीला त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयात त्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मित्रांची मोठी गर्दी झाली होती. बीड जिल्ह्यातील माजलगाव या मूळ गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अवैध सावकारांकडून एकाने घेतलेल्या कर्जाचा विश्वजीतने हवाला घेतला होता. मात्र त्याचा मित्र वेळेत कर्जफेड न करु शकल्यामुळे सावकारांनी विश्वजीतमागे तगादा लावला होता. काही हजार रुपयांचे काही दिवसांतच लाखो रुपयांच्या कर्ज व व्याजात रुपांतर झाले होते. महाविद्यालयीन युवकांना सावकारी पाशात अडकवून त्यांचे आयुष्य उध्वस्त करणारी मोठी टोळी शिरपुरात कार्यरत असल्याचे वारंवार उघडकीस आले आहे.