क्राईम ब्लास्ट ब्यूरो
शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे बेघर वस्तीत सुरु असलेला बोगस दारु तयार करण्याचा कारखाना सांगवी पोलिसांनी केलेल्या कारवाईत उखडण्यात आला. तेथून सुमारे दीड लाख रुपये किंमतीची दारु जप्त करण्यात आली.
सांगवी पोलिस स्टेशनचे एपीआय सुरेश शिरसाठ यांना बोराडी परिसरात बोगस दारु तयार करुन विकली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी सहकार्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यावरुन 17 ऑक्टोबरला रात्री साडेआठला सांगवी पोलिसांच्या पथकाने बोराडी येथील बेघर वस्तीत राजेश विश्वास पावरा याच्या घरावर छापा टाकला. मात्र कारवाईचा सुगावा लागल्याने राजेश पावरा गल्लीबोळातून पळून गेला.
त्याच्या घरात दरवाजाजवळ व किचनमध्ये देशी दारु टँगो पंचचचे लेबल लावलेल्या1920 बाटल्या, बाटली सीलबंद करण्याचे यंत्र, 70 लिटर स्पिरीट, अल्कोहोल मीटर आदि मिळून एकूण एक लाख 52 हजार 120 रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळला. एसपी प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, प्रभारी डीवायएसपी दिनेशकुमार आहेर यांच्या नेतृत्वाखाली एपीआय सुरेश शिरसाठ, पीएसआय भिकाजी पाटील, हवालदार जाकिर शेख, आरीफ पठाण, संदीप ठाकरे, मनोज नेरकर, मनोज पाटील, संतोष पाटील यांनी ही कारवाई केली.