क्राईम ब्लास्ट ब्यूरो
जादूटोणा करून बहिणीचा जीव घेतल्याच्या संशयावरून महिलेस गावच्या स्मशानात गोल चक्कर मारायला लावल्याने एकच खळबळ मजली आहे.
या प्रकरणातील संशयित तीन महिला व एका पुरुषाविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात नरबळी अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक उच्चाटन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाच्या माहितीनुसार नंदुरबार अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा कुकरखाडीपाडा येथील रहिवासी मोकण्या खेमा वसावे याची बहीण वजाबाई बोख्या पाडवी हिचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. तिला जादूटोणा करून मारून टाकल्याचा संशय त्याला होता. जादूटोण्याचा प्रकार गावातील चमारीबाई होमा पाडवी हिने केल्याचा वहिम त्याच्या मनात रुजला होता. त्यावरून मोकण्या वसावे, त्याची पत्नी हुवलाबाई वसावे, वंती वसावे व रायकाबाई वसावे यांनी 10 ऑक्टोबरला सायंकाळी पाचला चमारीबाईच्या घरी जाऊन दोरीने तिचे दोन्ही हात बांधले. तिला स्मशानभूमीत घेऊन जाऊन गोल चक्कर मारून जमिनीला हात लावून शपथ घेण्यास भाग पाडले. घटनास्थळी तिला मारहाण करण्यात आली. त्यामुळे ती जखमी झाली. तिला मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या जबाबावरून संशयित चौघांविरोधात मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर तपास करीत आहेत.