क्राईम ब्लास्ट ब्यूरो
तक्रार अर्जावर कारवाई करण्यासाठी व थकीत भाडे काढून देण्यासाठी चार हजारांची लाच घेतांना हवालदार आणि पंटर अशा दोन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले.

तक्रारदाराने स्वतःच्या मालकीच्या बैलगाड्या गावातीलच एकाला भाडेतत्वावर दिल्या होत्या. तो तक्रारदार यांच्या बैलगाड्या व भाडे देत नसल्यामुळे तक्रारदार यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे केलेल्या अर्जावर कारवाई करण्यासाठी व बैलगाड्या आणि भाडे मिळवून देण्याच्या मोबदल्यात हवालदार राकेश दत्तात्रेय खोंडे (वय 43) याने पाच हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची तयारी नसल्याने तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. अधिकाऱ्यांनी सापळा रचला. ठरलेल्या पाच हजारा पैकी चार हजार रुपये हवालदार खोंडे याचा पंटर सुकलाल शांताराम पाटील (वय 46) याने त्याच्या चहाच्या टपरीवर स्वीकारले. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. लाच मागणे व स्वीकारल्याच्या संशयावरून हवालदार खोंडे व सुकलाल पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीचे उपअधीक्षक शशिकांत पाटील, निरीक्षक एस.के.बच्छाव, एन.एन.जाधव, सहायक निरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, सुनिल पाटील आदींनी ही कारवाई केली.