क्राइम ब्लास्ट ब्यूरो
गणेशोत्सवादरम्यान विसर्जन मिरवणुकीत मंडळांसोबत बेधुंद नृत्य करणार्या पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांचे व्हिडीओ व्हायरल होऊन त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. मात्र यापुढे गणवेशात नाचतांना आढळल्यास ती कायद्यासमोर समानता व कायद्याचे समान संरक्षण या मूलभूत हक्कांची पायमल्ली मानली जाईल, अशा कृत्यांमुळे पोलिसांची कार्यपद्धती व कार्यक्षमतेबाबत संशय निर्माण होऊ शकेल त्यामुळे त्याचे परिणाम भोगण्यासाठी सज्ज राहावे अशी तंबी वरिष्ठ स्तरावरुन देण्यात आली आहे.

कारागृृह व सुरक्षा विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी यासंदर्भातील परिपत्रक 28 सप्टेंबरला जारी केले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 नुसार, शासकीय सेवकांनी कर्तव्यपालन करतांना उच्च दर्जाचा नि:पक्षपातीपणा दाखवणे आवश्यक आहे. त्यांनी पूर्वग्रहाचा त्याग करुन तटस्थपणे कर्तव्य पार पाडणे अपेक्षित आहे. मात्र, अलिकडे काही पोलिस अधिकारी व कर्मचार्यांच्या कृती आक्षेपार्ह असल्याचे दिसून आले आहे. आपले सामाजिक व धार्मिक पूर्वग्रह आणि श्रद्धा जोपासून त्यांनी लोकांशी, मंडळांशी संवाद साधल्यामुळे तशी कृत्ये घडून आली आहे. वैयक्तिक फायद्यासाठी, अनुकूलता मिळवण्यासाठी, लोकांकडून सन्मान मिळवण्याच्या हेतूने अधिकृत पदांचा गैरवापर करण्यात आला. काही प्रकरणांमध्ये पोलिस ठाण्यास भेट देणार्या, संरक्षण कोठडीत ठेवलेल्या किंवा गुन्ह्यांमध्ये अटक केलेल्या लोकांना वाईट वागणूक देण्यात आली. एका महिलेसंदर्भात दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण पोलिस खात्याला मोठा मनस्ताप सोसणे भाग पडले. काहींनी समाजकंटकांच्या कार्यक्रमांना हजेरी लावून सत्कार स्विकारल्याने पोलिस विभागासमोर पेच उभा राहिला. काही पोलिस अधिकारी, अंमलदार धार्मिक कार्यक्रम, मिरवणुकीत गणवेशात नाचतांना दिसले, काही वाद्ये वाजवितांना आढळले. काहींनी सोशल मिडीयावर बेजबाबदार वक्तव्ये केली, स्वत:च्या व इतरांच्या चित्रफिती तयार करुन सोशल मिडीयावर व्हायरल केल्या. त्यामुळे पोलिसांवरील विश्वासाला तडा गेला. यापुढे पोलिसांच्या प्रतिमेला धक्का पोहचेल असे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही याची अधिकारी, कर्मचार्यांनी नोंद घ्यावी असे श्री भारंबे यांनी परिपत्रकात म्हटले आहे.