क्राईम ब्लास्ट ब्यूरो
आपली शेजारीण स्त्रीच्या रुपात डाकीण असून ती जादूटोणा करून माणसांचा जीव घेते, गुरांनाही मारून टाकते असा संशय घेऊन महिलेस मारहाण केल्याने बापलेकांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
डाकीण प्रथा निर्मूलनासाठी शासन कायदे करून, जनजागृती अभियान राबवून अथक प्रयत्न करीत असतांना नंदुरबार जिल्ह्यात ही घटना घडल्याने अद्याप तेथील समाजमन अंधश्रद्धेच्या विळख्याबाहेर पडण्यास तयार नसल्याचे दिसून आले आहे. या प्रकाराची राज्य महिला आयोगाने दखल घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.
नंदुरबार जिल्ह्यात धडगाव तालुक्यात केली हे गाव आहे. तेथील काल्ला नाना वसावे व कोमल्या काल्ला वसावे यांना आपल्या शेजारील महिला डाकीण असून जादूटोणा करीत असल्याचा संशय होता. सात सप्टेंबरला दुपारी तिनला दोघा बापलेकांनी त्या 35 वर्षीय महिलेस घराजवळ गाठले. तू डाकीण बनून तांत्रिक तोडगे करून माणसे व गुरे खाऊन टाकते, तुला गावात राहू देणार नाही असे धमकावून तिला पाठीवर, पायावर बेदम मारहाण केली व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून धडगाव पोलिस ठाण्यात नरबळी व अमानुष अघोरी विद्या प्रतिबंध कायद्यान्वये दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक गौतम औताडे तपास करीत आहेत.