अमरीश भाईंनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचे दर्शन
राज्याचे माजी शिक्षण मंत्री व धुळे नंदुरबार विधान परिषद मतदार संघाचे आमदार अमरीश भाई पटेल यांनी सहा सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला .
श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे अध्यक्ष व एनएमआयएमएस अभिमत विद्यापीठाचे कुलपती असलेले अमरीशभाई पटेल सर्वपक्षीयांमध्ये लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. गणेशोत्सवनिमित्ताने 6 सप्टेंबरला त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट दिली. नामदार एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेल्या गणरायाचे त्यांनी दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा हृदय सत्कार केला.
बाजार समितीची निवडणूक जाहीर
दीर्घ काळापासून प्रतीक्षेत असलेल्या शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला. 23 डिसेंबरला निवडणुकीची घोषणा केली जाईल. 23 ते 29 डिसेंबर दरम्यान उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील. दोन ते 16 जानेवारी 2023 या कालावधीत माघार घेण्याची मुदत आहे. 17 जानेवारीला उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित केली जाईल. 29 जानेवारीला मतदान तर 30 जानेवारीला मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
चाकूच्या धाकाने तरुणीवर अत्याचार
घरात एकटी असलेल्या तरुणीच्या गळ्यावर चाकू लावून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरात शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. एक सप्टेंबरला रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान पीडित 20 वर्षीय तरुणी घरात एकटी होती. ही संधी साधून संशय विनोद शुकलाल भोळे याने घरात प्रवेश केला. तिला मारहाण करून गळ्याला चाकू लावून तिच्यावर दोनदा अत्याचार केला. सहा सप्टेंबरला पीडित तरुणीने शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एपीआय रमेश चव्हाण तपास करीत आहेत.
सोनगीरजवळ अफू पकडला
शिरपूरकडून धुळ्याकडे जाणाऱ्या कारमधून मोठ्या प्रमाणात अफूचा साठा पोलिसांनी जप्त केला. वाहन चालक मात्र कार सोडून फरार झाला. सहा सप्टेंबरला रात्री पावणेदोनला हायवेवर सोनगीर पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी शिरपूरकडून धुळ्याकडे मारुती स्विफ्ट डिझायर कार (एमपी 04 सीके 9787) भरधाव वेगाने जाताना दिसली. संशयावरून पोलिसांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र काही अंतरावर अंधारात कार उभी करून चालक पळून गेला. कारची झडती घेतल्यावर सहा लाख 44 हजार 800 रुपये किमतीचा अफूचा चुरा व तीन मोबाईल आढळले. एकूण नऊ लाख साठ हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. फरार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सोनगीर पोलीस ठाण्याचे एपीआय चंद्रकांत पाटील, अजय सोनवणे, संजय देवरे सुरजकुमार सावळे, प्रवीण सोनवणे, विजयसिंह पाटील, राकेश ठाकूर यांनीही कारवाई केली