क्राईम ब्लास्ट ब्यूरो
शंभर रुपयाला लागलेला दंड रद्द करून घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शासकीय अभियंत्याला तब्बल तीन लाखांचा चुना लागल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
धुळे येथील पाटबंधारे विभागाचे उप अभियंता दिलीप सुधाकर जडे यांच्या बाबतीत हा प्रकार घडला. त्यांनी एटीएम मध्ये क्रेडिट कार्डचा वापर करून शंभर रुपये काढले होते. त्या पोटी त्यांना 354 रुपये दंड आकारण्यात आला. त्यांना अज्ञात महिलेने मोबाईलवर संपर्क केला. तुमचा दंड रद्द करून देते असे सांगून त्यांच्याकडून संपूर्ण नाव, क्रेडिट कार्डचा नंबर, क्रेडिट कार्ड मिळाल्याची तारीख अशी माहिती तिने विचारून घेतली. त्यानंतर एकापाठोपाठ तीनदा जडे यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक विचारून त्यांच्या क्रेडिट कार्ड मधून अनुक्रमे 99 हजार 274, 98 हजार 767 व 99 हजार 274 रुपये असे एकूण दोन लाख 97 हजार 315 रुपये परस्पर ट्रांजेक्शन करून काढून घेतले. जडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित अनोळखी महिलेविरोधात धुळे येथील पोलीस ठाण्यात भादंवि 420 व माहिती तंत्रज्ञान अधिनियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक गोराडे तपास करीत आहेत.