क्राईम ब्लास्ट ब्यूरो
बहिणीच्या प्रेम प्रकरणाचा राग येऊन भावाने तिच्या प्रियकरावर गोळी झाडून तर बहिणीचा गळा दाबून खून केला. चोपडा शहरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. खुनाच्या संशयावरून दोन अल्पवयीन संशयितांना चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वर्षा समाधान कोळी (वय 20, रा.सुंदरगढी, चोपडा) व राकेश संजय राजपूत (वय 22, रा.रामपुरा, चोपडा) अशी खून झालेल्या युवक-युवतीची नावे आहेत. त्या दोघांचे प्रेम संबंध असून त्याचा राग आल्याने वर्षाच्या भावाने दोघांचा खून केल्याचा संशय आहे. मृत युगुलाचे मृतदेह चोपडा शहरालगत जुना वराड रोड शिवारातील नाल्यात आढळले. राकेश राजपूतला गोळी लागली होती तर वर्षाला गळा दाबून ठार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. विशेष म्हणजे खून केल्यानंतर रात्री साडेदहाला संशयित हातात पिस्तूल घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाला. आपण दोन जणांचा खून केल्याची कबुली त्याने दिली. त्याच्यासह एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन्ही संशयित अल्पवयीन आहेत. ऑनर किलिंगच्या या घटनेमुळे चोपडा शहर व परिसरात खळबळ माजली आहे.