क्राईम ब्लास्ट ब्यूरो
शासनाच्या आदेशावरुन धान्य वाटप बंद असल्याचे सांगितल्यानंतरही रेशन दुकानदारावर तिघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील कळमसरे गावात घडली. संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रेशन दुकानदार संघटनेने याप्रकरणी महसूल व पोलिस अधिकार्यांची भेट घेऊन संशयितांवर कठोर कारवाईची मागणी केली.
कळमसरे येथे बी.व्ही.कलाल रेशन दुकान चालवतात. त्यांच्याकडे नऊ ऑगस्टला संशयित जितेंद्र राजपूत, रवींद्र राजपूत व योगेश राजपूत गेले. त्यांनी रेशनची मागणी केली. परंतु शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना एनआयसी कंपनीमार्फत 2017 मध्ये धान्य वाटपासाठी दिलेल्या टू-जी सिस्टीम असलेल्या ई-पॉस मशिन कालबाह्य झाल्या असून त्याद्वारे ग्राहकांचा अंगठा घेवून धान्य वाटप करणे अशक्य झाले आहे. राज्यभरात ई पॉस मशीन्सला अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यासह तालुक्यात सात ते आठ दिवसांपासून धान्यवाटप बंद आहे असे कलाल यांनी त्यांना सांगितले. पुरवठा विभागाकडून आलेला मेसेजदेखील संबंधित तरुणांना दाखवला. तरीदेखील तिन्ही युवकांनी दुकानदाराला शिवीगाळ व धक्काबुक्की करत त्याच्या मुलांनाही लाकडी दांड्यांनी जबर मारहाण केली. दुकानदार व त्यांच्या दोन्ही मुलांवर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिरपूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार असोसिएशनने या घटनेच्या निषेध नोंदवत 11 ऑगस्टला तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन दिले. दोषींवर 353 प्रमाणे गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. गेल्या कोरोना संकटाच्या काळात शासनाच्या धान्य योजनेचा लाभ सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी रेशन दुकानदार स्वतःचा जीव धोक्यात घालून नियमितपणे धान्य वाटप करीत होते. त्यांच्या त्यागाचा विसर पडून उलटपक्षी प्राणघातक हल्ला होणे अत्यंत वाईट आहे. यापुढे असे प्रकार घडू नयेत म्हणून संशयितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिरपूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष रजेसिंग राजपूत, राजेश पाटील,महेश अग्रवाल, जाकिर शेख, बापू थोरात, रविंद्र गिरासे आदिंनी निवेदनातून केली.