मुलास कानफटात मारणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा
क्राईम ब्लास्ट ब्यूरो
रिमांड होममधील मुलाच्या कानफटात मारणाऱ्या केअर टेकर विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रिमांड होममधील मुले पळून गेल्यानंतर त्यांच्या पलायनाचा तपास करताना हा प्रकार उघडकीस आला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथील रिमांड होममधून 2 ऑगस्टला पहाटे दोन अल्पवयीन बालक पळून गेले होते. त्यांनी रिमांड होमची भिंत कोरून एक व्यक्ती बाहेर पडेल असे भोक तयार करून पळ काढल्याचे निष्पन्न झाले. या घटनेचा तपास करत असताना दोघांना शिरपूर येथील अल्पवयीन संशयितासह दोघांनी मदत केल्याचे समोर आले.
घडल्या प्रकाराबाबत अधिक माहिती घेताना रिमांड गृहात केअर टेकर म्हणून नोकरीला असलेल्या गोरख कुंदन वानखेडे यांची चौकशी करण्यात आली. त्यात संबंधित मुलाने त्यांच्याशी बोलताना उलट उत्तर दिले म्हणून त्याच्या कानफटात मारल्याचे त्यांनी सांगितले. विधीसंघर्षित बालकांना शिस्त लावण्यासाठी मारहाण करणे अभिप्रेत नसल्यामुळे रिमांड होमच्या अधिक्षिका अर्चना विजय पाटील यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संशयित गोरख कुंदन वानखेडे यांच्या विरोधात भादंवि 323 सह मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 चे कलम 82 (एक) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक के.एस. पटाईत तपास करीत आहेत