क्राईम ब्लास्ट ब्यूरो
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दिनांक 03/08/2022 रोजी सायंकाळी अक्कलकुवा मार्गे गुजरात राज्यात मार्गे एका टाटा कंपनीच्या टेम्पोमध्ये गहु-मक्याच्या भुश्यात अफुची वाहतूक होणार आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी तात्काळ अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अन्साराम आगरकर यांना माहिती कळवून कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते.
मिळालेल्या खात्रीशीर बातमीच्या आधारे अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अन्साराम आगरकर यांनी दिनांक 03/08/2022 रोजी अक्कलकुवा बऱ्हाणपुर महामार्गावर वर सापळा रचला. अक्कलकुवा शहरातील तळोदा नाक्याकडून अक्कलकुवा गावाच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असतांना तळोदा नाक्याकडून अक्कलकुवा गावाच्या दिशेने एक टाटा कंपनीचा टेम्पो भरधाव वेगाने येतांना दिसुन आल्याने पोलीस पथकातील अमंलदारांनी हाताच्या सहाय्याने त्यास उभे करण्याचा इशारा दिला. त्यावरुन टेम्पो चालकाने वाहन थांबविला. पथकातील पोलीसांनी त्याच्याकडे वाहनाचे कागदपत्रांची मागणी केली असता वाहन चालकाने वाहन रस्त्याच्याकडेला उभे करुन खाली उतरुन पाणी लेके आता हु और कागदपत्र दिखातू असे म्हणून तो पाणी पिण्यासाठी गेला असता वाहन चालक परत आलाच नाही. अक्कलकुवा पोलीसांना संशय आल्याने त्यांनी सदर वाहन चालकाचा शोध घेतला परंतु तो मिळून न आल्याने सदरचा टेम्पो अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे आणण्यात आला.
सदरच्या टेम्पोची अक्कलकुवा पोलीसांनी दोन पंचासमक्ष पाहणी केली असता पिवळ्या रंगाच्या ताडपत्रीमध्ये गहु-मका याचा भुसा भरलेला होता. मिळालेल्या बातमीची खात्री झाल्याने अक्कलकुवा पोलीसांनी वाहनाची अधिक बारकाईने तपासणी केली असता टेम्पोमध्ये गहु-मका याच्या भुस्याखाली 13 लाख 55 हजार रुपये किमंतीच्या अफुच्या झाडांच्या बोंडांचा चुऱ्याच्या 18 काळ्या रंगाच्या प्लास्टीकच्या गोण्या मिळून आल्या. मिळून आलेल्या अफुच्या झाडांच्या बोंडांचा चुऱ्याच्या 18 काळ्या रंगाच्या प्लास्टीकच्या गोण्या व 3 लाख रुपये किमतीचा टाटा टेम्पो क्रमांक MP-09 U-6277 असा एकुण 16 लाख 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करण्यात आला आहे. टाटा टेम्पो क्रमांक MP-09 U-6277 हिचेवरील चालक याचेविरुध्द् अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 337/2022 गुंगीकारक औषध द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलम 17(क), 18(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरचा अफुच्या झाडांच्या बोंडांचा चुरा हा कोणाकडून विकत आणला व कोठे विकण्यासाठी जात होता याबाबत पोलीस तपास करीत असून दोषींविरुध्द् कठोर कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी सांगितले.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा श्री. संभाजी सावंत यांचे मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अन्साराम आगरकर, सहा.पोलीस निरीक्षक श्री. राजेश गावीत, पोलीस उप निरीक्षक श्री. रितेश राऊत, जितेंद्र महाजन, देविदास वडघुले, पोलीस हवालदार कपिल बोरसे, पोलीस नाईक आदिनाथ गोसावी, देविदास विसपुते, अजय पवार, पोलीस कॉन्सटेबल संदीप महाले, अमरसिंग पाडवी, मोबाईल फॉरेन्सीक पथकातील पोलीस नाईक दिनेश लाडकर, संजय रामोळे, चेतन चौधरी यांनी केली असुन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी संपुर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.