क्राईम ब्लास्ट ब्यूरो
भल्या पहाटे शेजाऱ्याच्या घरात बायकोसोबत सापडलेल्या युवकावर चाकूने वार करणाऱ्या पतीने पत्नीलाही भोसकण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर संशयित पतीला अटक करण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्यात वाघाळे गावात 16 जुलैला पहाटे चारला हा प्रकार घडला. गणेश तथा दला ब्रिजलाल जाधव असे संशयितांचे नाव आहे. त्याची पत्नी शर्मिला उर्फ मिनू (वय 29) व शेजारी राहणारा रविंद्र डोंगरसिंह चौरे (वय 32) यांचे अनैतिक संबंध असल्याचा गणेशला संशय होता. 16 जुलैला पहाटे घराच्या मागील बाजूस खुडबुड झाल्याने त्याला जाग आली. त्याने उठून पाहिले असता पत्नी शर्मिला जागेवर नव्हती. त्याने दबक्या पावलाने जाऊन पाहिले असता रवींद्रच्या घरात शर्मिला व रवींद्र एकत्र आढळले. त्यामुळे संताप अनावर होऊन गणेशने हातातील चाकूने रवींद्रच्या मानेवर आणि पोटावर सपासप वार केले. शर्मिलाच्याही हातावर चाकूने वार करून तिला जखमी केले. रविंद्रची कॉलर धरून घराबाहेर फरफटत आणून तुमचे लफडे आहे, तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन तो निघून गेला. जखमी रवींद्र आणि शर्मिला यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रवींद्रचे वडील डोंगरसिंह चिनू चौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित गणेश जाधव याच्याविरोधात नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक सुरेश सोनवणे तपास करीत आहेत.