क्राईम ब्लास्ट ब्यूरो
बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्यानंतर मृतदेह शौचालयाच्या टाकीत टाकून देणाऱ्या नराधमांना पोलिसांनी 24 तासांत अटक केली. संशयितांमध्ये एका महिलेलाही समावेश आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार व उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या नेतृत्वाखाली मयत बालिकेची ओळख पटविण्यासाठी व गुन्ह्यात सहभागी असलेल्या अज्ञात आरोपीचा तात्काळ शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करुन त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.
बालिकेचा मृतदेह मिळून २४ तास उलटले तरी आरोपी किंवा इतर कोणतीही उपयुक्त माहिती मिळत नव्हती. अधीक्षक पी.आर.पाटील, विजय पवार, सचिन हिरे, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर हे नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथेच तळ ठोकून होते.
त्यावेळी पी.आर.पाटील यांना नंदुरबार शहरातील कंजरवाडा परिसरात फिरणाऱ्या एका महिलेकडे तीन जुलैला सायंकाळी 2 वर्षे वयाची लहान मुलगी व आणखी तीन ते चार इसम फिरत होते अशी माहिती मिळाली. पाटील यांच्या आदेशावरून पीआय रविंद्र कळमकर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह नंदुरबार शहरातील कंजरवाडा परिसरात महिलेला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले. कंजरवाडा, रेल्वे स्टेशन व आजुबाजुच्या परिसरात संशयित महिलेचा शोध घेतला मात्र ती आढळली नाही. अखेर शहरातील उड्डाण पुलाचे खाली खांबाच्या आडोश्याला एक महिला बसलेली दिसली. त्या महिलेचे वर्णन संशयीत महिलेच्या वर्णनाशी मिळते जुळते असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिला ताब्यात घेतले. संशयीत महिलेला ताब्यात घेवून पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आणून विचारपुस केली असता ती सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे देत होती म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी स्वत: महिला पोलीस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा यांचे समक्ष संशयीत महिलेकडे कौशल्यपूर्वक सखोल विचारपूस केली असता तिच्याकडून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली.
रात्रीच्या वेळेस रणजित, रविंद्र, मुकेश यांनी त्या चिमुकलीला रेल्वे कॉलनी परिसरातील रेल्वे नियंत्रण कक्षाच्या लगत असलेल्या एका सेफ्टी टँकजवळील भागात आणले. त्यावेळी संशयीत महिला ही रस्त्यावर उभी राहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी उभी होती. संशयीत महिला हिचा पती रणजित पवार याने त्या अनोळखी दोन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. जिवाच्या आकांताने रडणाऱ्या त्या चिमुकलीचा रणजित याने गळा आवळून खून केला. त्यानंतर सर्वांनी मिळून तिचे प्रेत रेल्वे कॉलनी परिसरातील नियंत्रण कक्षाच्या लगत असलेल्या एका सेफ्टी टँकमध्ये फेकून दिले होते.रणजित दिना पवार हा नवापूर येथे असल्याची माहिती मिळाली. नवापुर पोलीसांनी रणजित यास नवापूर शहरातून ताब्यात घेतले. तर मुकेश नारायण आर्य व रविंद्र विजय पावरा यांना नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी नंदुरबार शहरातून ताब्यात घेतले.
1) संशयीत महिला 2) रणजित दिना पवार वय-38 रा. नागसर ता. नवापुर जि. नंदुरबार ह.मु. नवापुर 3) मुकेश नारायण आर्य वय-25 रा. धनोरा ता. सेंधवा जि. बडवाणी मध्य प्रदेश 4) रविंद्र विजय पावरा वय-25 चिकलटी फाटा, शेलकुवी ता. धडगांव जि. नंदुरबार यांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी ताब्यात घेण्यात आलेले आहे.
सदर चिमुकलीची ओळख न पटल्याने तिची ओळख पटविण्यसाठी व चिमुकलीच्या नातेवाईकांचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी 3 पथके गुजरात राज्यात रवाना केलेली आहे. तसेच यामध्ये आणखी काही आरोपीतांचा सहभाग आहे अगर कसे ? याबाबत पडताळणी करण्यात येत आहे असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी सांगितले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील,अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उप विभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर व पोलीस उप निरीक्षक हेमंत मोहिते तसेच स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाच्या अमंलदारांनी बजावली.