क्राईम ब्लास्ट ब्यूरो
अपहरण झालेल्या, बेवारशी, भीक मागून पोट भरणाऱ्या, कचरा वेचणाऱ्या, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या 198 बालकांना चांगले जीवनमान देण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन मुस्कान-11 मोहिमेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात एकूण 198 बालकांना शोधण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले.
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ही कामगिरी बजावली. ऑपरेशन मुस्कानसाठी जिल्हा बालकल्याण समिती, जिल्ह्यातील बाल संरक्षण गृहे, बालकांसाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्था, बालपोलिस पथकातील अधिकारी कर्मचारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली पथके स्थापन करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी समन्वय बैठक घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याचे एक अधिकारी व चार अंमलदार यांची पथकासाठी नियुक्ती केली.
रेल्वे स्टेशन, बस स्थानक, धार्मिक स्थळे, हॉटेल्स, ढाबे येथे काम करणाऱ्या भिक्षा मागणाऱ्या, कचरा वेचणाऱ्या बालकांचा शोध घेण्यात आला. त्यात नंदुरबार शहर पोलीस ठाण्याने 14 मुले व पाच मुली, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याने 11 मुले व एक मुलगी, उपनगर पोलीस ठाण्याने 12 मुले व पाच मुली, विसरवाडी पोलीस ठाण्याने 12 मुले व तीन मुली, नवापूर पोलीस ठाण्याने 14 मुले व चार मुली, शहादा पोलीस ठाण्याने तीन मुले व तीन मुली, सारंगखेडा पोलीस ठाण्याने 12 मुले व 11 मुली, म्हसावद पोलीस ठाण्याने 20 मुले व पाच मुली, धडगाव पोलीस ठाण्याने 10 मुले व एक मुलगी, तळोदा पोलीस ठाण्याने नऊ मुले व एक मुलगी, अक्कलकुवा पोलीस ठाण्याने 14 मुले व तीन मुली, मोलगी पोलीस ठाण्याने पाच मुले व एक मुलगी अशा एकूण 141 मुले व 43 मुली यांचा महिनाभरात शोध लावला. त्यांच्या पालकांचा तपास करून, समक्ष बोलावून समुपदेशन करीत शिक्षणाची व बाल हक्कांची माहिती देण्यात आल. त्यानंतर या मुलांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले अल्पवयीन मुलांना कामाला ठेवणाऱ्या हॉटेल चालकांना कायदेशीर समज देण्यात आली. पालक नसलेल्या बालकांना बाल संरक्षण गृहात रवाना करण्यात आले. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर अधीक्षक विजय पवार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली.