क्राईम ब्लास्ट ब्यूरो
नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारांवर वचक राहावा याकरीता नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळीतील एकुण 05 इसमांना महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 55 च्या प्राप्त अधिकारान्वये नंदुरबार जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार केलेले आहे. हद्दपार करण्यात आलेले सर्व इसम शहादा तालुक्यातील आहेत.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा कार्यभार स्वीकारल्यापासुन नंदुरबार शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी बाधा ठरणारे तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती घेतली. त्यांचेवर दाखल गुन्ह्यांचा आढावा घेतला असता शहादा, म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील काही आरोपी त्यांची दहशत व वचक ठेवण्यासाठी बेकायदेशीररीत्या टोळी तयार करुन नियमितपणे मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करण्याचे सवयीचे असल्याचे त्यांचे निदर्शनास आले. त्यांचेपासून सामान्य नागरिकांच्या मालमत्तेस व जिवीतास धोका निर्माण झालेला असल्याचे त्यांना आढळून आले. त्याप्रमाणे अशा आरोपीतांवर कठोर प्रतिबंधक कारवाई करावी याबाबत पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील यांनी प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते.
शहादा व म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या टोळीतील 05 इसमांविरुध्द मालमत्तेविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यावरुन म्हसावद पोलीस ठाणेकडून एक टोळीस हद्दपार करणेबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाला. सदर हद्दपार प्रस्तावाचा नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, श्री. पी. आर. पाटील यांनी आढावा घेवून प्रस्तावाची छाननी केली. तसेच योग्य ती कायदेशीर प्रकिया पार पाडून 05 इसमांना 02 वर्ष कालावधीसाठी नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, श्री. पी. आर. पाटील यांनी दिले आहेत.
टोळीतील हद्दपार इसमांची नांवे 1 ) योगेश कृष्णा पवार वय 25 रा. सुलवाडे पो. सुलतानपूर ता. शहादा 2) अजय आंबालाल मोरे वय 24 रा. सुलवाडे पो. सुलतानपूर ता. शहादा 3) सोमनाथ काशिनाथ दशरथ रा. सुलवाडे पो. सुलतानपूर ता. शहादा 4) आकाश राजु शेमळे वय 20 रा. सुलवाडे पो. सुलतानपूर ता. शहादा 5) अजय ऊर्फ टायगर राजेंद्र पावरा वय-22 रा. ब्राम्हणपुरी ता. शहादा जि. नंदुरबार अशी आहेत.
हद्दपार आदेशाची अमंलबजावणी तातडीने करण्यात येत असुन हद्दपार इसमांनी आदेश प्राप्त झाल्यावर 48 तासाचे आंत तातडीने जिल्हा हद्दीबाहेर निघुन जाणेबाबत आदेश देण्यात आले आहेत. तसेच हद्दपार इसमांनी नंदुरबार जिल्ह्यात येतांना मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार व मा. न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. हद्दपार आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांचे विरुध्द प्रचलीत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच वरील 05 हद्दपार इसम नंदुरबार जिल्ह्यात कुठेही दिसुन आल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्ष, नंदुरबार येथे कळवावे असे पोलीस प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.