क्राईम ब्लास्ट ब्यूरो
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवल्या जाणाऱ्या माध्यमांमध्ये काही अपप्रवृत्ती शिरल्या असल्याची बाब नवी नाही. मात्र आता तोतया पत्रकारांचा उपद्रव थेट शिरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील व्यावसायिकांना होत आहे. परजिल्ह्यातून आलेल्या खंडणीखोरांनी पत्रकारितेचा बुरखा पांघरून दुकानदारांना लुटण्याचा धंदा सुरू केला आहे.
आदिवासी भागातील रेशन दुकानदार हे या खंडणीखोरांचे प्रमुख लक्ष्य आहेत. त्यांच्याकडे जाऊन तुमच्याविषयी तक्रारी आहेत, खूप भ्रष्टाचार केला आहे, दुकानाचा परवाना रद्द करून टाकू अशा धमक्या त्यांच्याकडून दिल्या जातात. संबंधित दुकानदार अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असल्यामुळे गर्भगळीत होतो. त्यावर तडजोड म्हणून तोतया पत्रकार दीड-दोन हजार रुपयांची मागणी करतात. पैसे घेऊन निघून जातात. दररोज नवे गाव आणि नवा दुकानदार गाठून हा उद्योग सुरू आहे.
केवळ रेशन दुकानदारच नव्हे तर इतरही व्यावसायिक त्यांचे लक्ष्य ठरले आहेत. पेट्रोल विक्रेते, पान टपरीचालक, किरकोळ वादावादीत सहभागी अशांकडे जाऊन त्यांना बोगस ओळखपत्र दाखवून मध्यस्थीच्या नावाने पैशांची वसुली केली जाते. इस गाव, उस गाव, बिस गाव करीत चाळीसगावच्या भामट्यानी घातलेला हा धुमाकूळ सांगवी पोलिसांनी गांभीर्याने घ्यावा व या बदमाशांना अटक करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.