क्राईम ब्लास्ट ब्यूरो
स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या हवालदाराने पोलिस निरीक्षकावर चाकू हल्ला केला. जखमी निरीक्षकाला जबर रक्तस्राव झाल्याने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. सेवाकाळात दिलेल्या वागणुकीचा बदला घेण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे.
व्यंकटेश एम. केंद्रे असे जखमी अधिकाऱ्याचे नाव आहे. ते औरंगाबाद येथील जिन्सी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. संशयित मुजाहिद शेख हा स्वेच्छानिवृत्ती घेतलेला पोलिस नाईक आहे. 21 जूनला सायंकाळी केंद्रे यांच्या सत्काराचा कार्यक्रम असल्याने ते पार्किंग परिसरात उभे होते. मुजाहेद शेख तेथे आला. त्यांच्यात संभाषण सुरू असतांनाच त्याने अचानक केंद्रे यांच्यावर चाकूहल्ला केला. दोनदा त्यांच्या पोटात आणि छातीत चाकू खुपसला. केंद्रे यांनी आरडाओरड केल्यानंतर सहकारी मदतीसाठी धावून गेले. जखमी केंद्रे यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. संशयित शेख याला अटक करण्यात आली.
मुजाहिद शेख पोलिस नाईक पदावर कार्यरत होता. त्याने स्वेच्छानिवृत्तीसाठी दिलेला पाच जूनला मंजूर झाला. तो कायम नशेत असल्याची माहिती मिळाली आहे. सणकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेख याने 2004-05 विशेष शाखेचे निरीक्षक संदीप बोरसे यांच्यावरही हल्ला केला होता. त्यानंतर त्याला डिसमिस करण्यात आले होते. मात्र त्याने कोर्टात धाव घेतली होती. चार वर्षांपूर्वी तो पुन्हा पोलीस दलात रुजू झाला
जिन्सी पोलिस ठाण्यात वर्षभरापूर्वी मद्याच्या नशेत तक्रारदाराशी हुज्जत घातल्याने केंद्रे यांनी शेख याला झापले होते. त्यावेळीही त्याने त्यांच्याशी वाद घातला होता. त्याचे व्यसन, कर्तव्यप्रति दुर्लक्ष याबाबत रिपोर्ट केल्यामुळे त्याचा केंद्रे यांच्यावर राग होता. त्यातूनच त्याने हल्ला केल्याची चर्चा आहे.