शिरपूर (प्रतिनिधी) : शहरातील लखा पाटील नगर परिसरात इस्कॉन परिवाराच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भव्य श्री राधा-कृष्ण मंदिराच्या पायाभरणी सोहळ्याचा शुभारंभ गुरुवारी (दि. ४) उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा शिरपूर-वरवाडे नगर परिषदेचे गटनेते भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारात भूमिपूजन व पायाभरणी करण्यात आली.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी शिरपूरसह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. हरिनाम संकीर्तन, वैदिक मंत्रोच्चार आणि भक्तिगीतांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
यावेळी मुंबई येथील इस्कॉनचे शिवराम प्रभू व जानकीनाथ प्रभू यांच्यासह बालाजी संस्थानचे उपाध्यक्ष गोपाल भंडारी, कमलकिशोर भंडारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषारभाऊ रंधे, आबा साळुंखे, चंपालाल अग्रवाल, निलेश अग्रवाल, भूपेश अग्रवाल, नंदुरबारकर सराफ, नरेंद्र पाटील, इंजिनिअर पद्माकर शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.
समारंभात बोलताना शिवराम प्रभूंनी आधुनिक जीवनशैलीत अध्यात्म, संस्कार आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. मंदिरे ही समाजाला सकारात्मक दिशा देणारी केंद्रे असून या मंदिरामुळे परिसरातील नागरिकांना आध्यात्मिक साधना व संस्कारांचे व्यासपीठ उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.
जानकीनाथ प्रभूंनी मंदिर हे केवळ पूजा-अर्चनेचे ठिकाण नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उपक्रमांचे केंद्र बनेल, असे सांगितले. भाविकांना भगवद्गीता, श्रीमद्भागवत व वैदिक संस्कृतीची माहिती देण्यासाठी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्रद्धा असोसिएट्स, शिरपूर यांनी मंदिराचे आरेखन केले असून वास्तुरचना पारंपरिकतेसह आधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहे. भविष्यात हे मंदिर शिरपूर शहरातील प्रमुख धार्मिक व आध्यात्मिक केंद्र म्हणून विकसित होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इस्कॉन परिवारातील भक्तगण, स्वयंसेवक व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. पायाभरणी सोहळ्यामुळे लखा पाटील नगर परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
