
शिरपूर(प्रतिनिधी) शहरातील गुजराती कॉम्प्लेक्ससमोर असलेल्या नायरा पेट्रोल पंपाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवि राठोड यांनी ३१ मे रोजी सायंकाळी सुमारे साडे ६ वाजेच्या सुमारास गुजराती कॉम्प्लेक्ससमोरील पेट्रोल पंपाजवळ एक अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेला असल्याची माहिती दिली. त्यानंतर डायल ११२ पथकातील कर्मचारी सुरेश पावरा यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीला उपचारासाठी कॉटेज रुग्णालयात दाखल केले.
मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीप बस्सी यांनी सायंकाळी पावणे 7 वाजेच्या सुमारास त्या अनोळखी व्यक्तीला मृत घोषित केले. मयत व्यक्तीचे नाव, गाव व पत्ता अद्याप समजू शकलेला नाही.मयताचे अंदाजे वय ३५ ते ४० वर्षे असल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.याप्रकरणी
मयत व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास शिरपूर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी व तपासाधिकारी राजेंद्र रोकडे यांनी केले आहे.
