शिरपूर, ता. 20 : सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि तरुणांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘शिरपूर फर्स्ट’च्या वतीने तालुकाभर जनसंघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा 23 मे ते 27 मे दरम्यान शिरपूर तालुक्यातील विविध गावांना भेट देणार असून, 28 मे रोजी शिरपूर शहरातील विविध भागांत पोहोचणार आहे.
या यात्रेदरम्यान गावागावांत जाऊन नागरिकांच्या अडचणी, शेतकऱ्यांच्या समस्या, तरुणांच्या रोजगारविषयक प्रश्न, महिलांच्या अडचणी तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या त्रुटी यांची माहिती जाणून घेतली जाणार आहे. याशिवाय रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांबाबतच्या तक्रारीही नोंदविल्या जाणार आहेत.
यात्रेतून समोर आलेल्या प्रमुख प्रश्नांवर आधारित येत्या काळात शिरपूर फर्स्टच्या वतीने संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असून, गरज पडल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
जनसंघर्ष यात्रेचे आपल्या गावात उत्साहात स्वागत करून नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
