शिरपूर : किसान विद्या प्रसारक संस्थेअंतर्गत कार्यरत कर्मवीर पूर्वभरती सैनिकी प्रशिक्षण केंद्राने २०२६ मध्ये पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या यशाच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या कठोर मेहनत, चिकाटी व शिस्तबद्ध प्रशिक्षणाच्या जोरावर विविध पोलिस व सैन्य भरती प्रक्रियेत ७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये कु. अशोक हरसिंग पावरा व गणेश मनोज मराठे यांची धुळे पोलीस शिपाई पदासाठी, चेतन राजू पाटील यांची मुंबई शहर पोलीस शिपाई पदासाठी, राजा महाले यांची नवी मुंबई पोलीस शिपाई पदासाठी, आकाश पारधी यांची धाराशिव पोलीस शिपाई पदासाठी, पूर्वेश शरद बारी यांची मीरा-भाईंदर पोलीस शिपाई पदासाठी तसेच पंकज किशोर धाकड यांची आर्मी क्लर्क पदासाठी निवड झाली आहे.या सर्व यशस्वी प्रशिक्षणार्थींचा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा देत प्रामाणिकपणे देशसेवा करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी बीसीए विभाग प्रमुख प्रा. संदीप सोलंकी, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. राकेश बोरसे, प्रशिक्षक श्री. सागर कोळी तसेच सर्व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कर्मवीर पूर्वभरती सैनिकी प्रशिक्षण केंद्राची विशेष बाब म्हणजे संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी ग्रामीण व सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने मोफत स्वरूपात अत्याधुनिक मैदान सुविधा, क्रीडा साहित्य, ग्रंथालय, मार्गदर्शनपर लेक्चर्स, शारीरिक प्रशिक्षण तसेच नियमित सराव व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही विद्यार्थी मागे राहू नये, या सामाजिक भावनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा अनेक युवकांना मोठा लाभ होत असून केंद्रातून दरवर्षी अनेक विद्यार्थी पोलिस, सैन्य व विविध शासकीय सेवांमध्ये यश मिळवत आहेत.या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे सचिव श्री. निशांत रंधे , कोषाध्यक्षा आशाताई रंधे, संचालक राहुल रंधे, रोहित रंधे, शशांक रंधे तसेच संस्थेचे सर्व व्यवस्थापक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व नागरिकांनी यशस्वी प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा दिल्या.
