
शिरपूर, (प्रतिनिधी): ‘जनकल्याणासाठी जनगणना’ हे ब्रीदवाक्य घेऊन देशातील १६ वी जनगणना यंदा पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबविण्यात येत आहे. घर यादी व घरगणना आणि लोकसंख्या गणना अशा दोन टप्प्यांत ही प्रक्रिया पार पडणार असून, शिरपूर तालुक्यात पहिल्या टप्प्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.
पहिल्या टप्प्यात १ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांना स्वगणनेद्वारे स्वतःची माहिती ऑनलाइन पोर्टलवर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पोर्टलवर माहिती भरल्यानंतर नागरिकांना एक युनिक आयडी प्राप्त होणार असून, तो संबंधित प्रगणकाला देणे आवश्यक आहे.
यानंतर १६ मे ते १४ जून या कालावधीत नियुक्त प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन माहिती संकलित करणार आहेत. शिरपूर तालुक्यातील ५७५ घर यादी गटांसाठी ५७४ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी ९६ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. तसेच १० टक्के राखीव कर्मचारीही उपलब्ध ठेवण्यात आले आहेत.
प्रगणक त्यांच्या मोबाईलमधील HLO (House Listing Operation) या ॲपच्या साहाय्याने नागरिकांकडून ३३ प्रश्नांची माहिती संकलित करून ती तत्काळ ऑनलाइन नोंदविणार आहेत. नागरिकांनी दिलेली माहिती जनगणना कायद्यानुसार पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असल्याचे हो त्यांनी स्पष्ट केले आहे.
या मोहिमेसाठी १० फिल्ड ट्रेनर्समार्फत २७ एप्रिल ते ७ मे या कालावधीत प्रगणकांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले.
शिरपूर तालुक्यातील नागरिकांनी घरी येणाऱ्या प्रगणकांना अचूक माहिती देऊन जनगणनेच्या कामात सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार तथा जनगणना चार्ज अधिकारी महेंद्र माळी यांनी केले आहे.
