शिरपूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर शिरपूर तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ४४ लाख ६३ हजार ८०० किमतीची विदेशी दारू आणि कंटेनर जप्त केला. महाराष्ट्र शासनाचा कर बुडवून ही दारू राज्यात विक्रीसाठी आणली जात असल्याचा प्राथमिक अंदाज असून या कारवाईमुळे अवैध दारू तस्करीच्या रॅकेटमध्ये खळबळ उडाली आहे.
मध्यप्रदेश मार्गे धुळे दिशेने जाणाऱ्या RJ 32 GB 4036 या कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती शिरपूर तालुका पोलीस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना ७ मेच्या रात्री गोपनीय माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीवरून तालुका पोलिसांनी हाडाखेड चेकपोस्टवर सापळा रचून संशयित कंटेनर अडविला.
वाहन चालक सतिषकुमार पुडाराम जाट (रा. हरियाणा) याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी वाहन ताब्यात घेत पंचांसमक्ष तपासणी केली असता कंटेनरमध्ये “ऑल सिझन्स”, “अंकल टॉम” आणि “रॉयल चॅलेंज” कंपनीच्या दारूचे मोठ्या प्रमाणावर खोके आढळून आले.विशेष म्हणजे या बाटल्यांवर “Only Sale For Union Territory Chandigarh” असे लेबल आढळल्याने हा साठा महाराष्ट्रात बेकायदेशीर विक्रीसाठी आणण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
ऑल सिझन्स १८० मिली-१६० खोके,ऑल सिझन्स ७५० मिली- ५० खोके,अंकल टॉम ७५० मिली -४९ खोके,अंकल टॉम १८० मिली-१०० खोके,रॉयल चॅलेंज १८० मिली-७ खोके आणि टाटा कंटेनर RJ-32GB-4036 असा
एकूण ४४ लाख ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजोत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे,यांच्यासह पीएसआय मनोज कचरे,पोहेकॉ संतोष पाटील, संदीप ठाकरे, पोकॉ योगेश मोरे, विजय दिवरे, स्वप्निल बांगर, सुनील पवार, अल्ताफ मिर्झा व गुरुदास बडगुजर यांनी सहभाग घेतला.
