
शिरपूर : शिरपूर तहसील कार्यालयातील कामकाज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, ५ टक्के व्याजाच्या स्टॅम्प पेपरवर स्वाक्षरी व शिक्कामोर्तब केल्याच्या आरोपावरून नायब तहसीलदार गणेश बाबुराव सूर्यवंशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तक्रारदार संदीप जमादार यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत, आपल्या तक्रारीची योग्य दखल घेतली जात नसल्याचे म्हटले आहे.
जमादार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सावकारी व्यवहाराशी संबंधित ५ रुपये शेकडा व्याजाच्या स्टॅम्प पेपरवर नायब तहसीलदार सूर्यवंशी यांनी स्वाक्षरी व शिक्का मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात स्पष्टीकरण मागविल्यानंतर तहसील कार्यालयाकडून देण्यात आलेल्या पत्रात, “सदर स्टॅम्प पेपरवरील शिक्कामोर्तब हे कार्यालयाशी संबंधित नाही,” असे नमूद करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
मात्र, जर संबंधित दस्तऐवज कार्यालयाशी संबंधित नसल्याचा दावा केला जात असेल, तर सरकारी अधिकाऱ्याने अशा दस्तऐवजावर स्वाक्षरी कशी केली, असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत प्रशासनाकडून ठोस उत्तर मिळत नसल्याने संशय अधिक गडद होत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
तक्रार दिल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई न करता अर्जदाराला एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फिरविले जात असल्याचेही जमादार यांनी म्हटले आहे. तक्रारीतील मुख्य मुद्द्यांना बगल देत त्रोटक उत्तरे देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रकरणात दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संदीप जमादार यांनी दिला आहे. दरम्यान, या आरोपांमुळे तहसील कार्यालयातील प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

