शिरपूर :- भारतीय जनता पक्षाच्या धुळे जिल्हा संघटनेतर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण महाअभियान-२०२६ अंतर्गत तांडे ता. शिरपूर येथील मुकेशभाई आर. पटेल मिलिटरी स्कूलच्या सभागृहात दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यशाळेत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून संघटनात्मक बळकटी, पक्षाची विचारधारा आणि आगामी राजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात विविध मान्यवरांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करत पक्षाच्या संघटनात्मक रचनेची माहिती दिली. आगामी काळात पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून समाजातील सर्व घटकांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी प्रशिक्षणातून मिळणारे ज्ञान आणि मार्गदर्शन प्रत्यक्ष कामात उतरवून संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असेही यावेळी सांगण्यात आले.
या सत्राच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सरचिटणीस बेबीताई पावरा होत्या.तर कार्यशाळेचे उद्घाटन दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाजपा धुळे जिल्हा प्रभारी रविजी अनासपुरे, आमदार काशिराम दादा पावरा, आमदार रामदादा भदाणे, लोकनियुक्त नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, धुळे भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, नंदुरबार जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी, जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, माजी जि.प.अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, उपनगराध्यक्षा सौ. संगिता देवरे, शिरपूर विधानसभा प्रभारी के. डी. पाटील, दिलीप लोहार आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठा, शिस्त आणि जनसंपर्क यांचे महत्त्व पटवून देत संघटन विस्तारासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम करण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे यांनी केले. त्यांनी कार्यशाळेच्या उद्देशावर प्रकाश टाकताना पक्षाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी, संघटनात्मक कौशल्यवृद्धी आणि नेतृत्व विकास हे या प्रशिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेऊन जनतेच्या प्रश्नांवर अधिक सक्षमपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले यांनी केले. कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाचा आढावा घेत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळेदरम्यान विविध विषयांवरील सत्रांमध्ये संघटन व्यवस्थापन, सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती तसेच जनसंपर्क तंत्र यावर मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या दोन दिवसीय निवासी कार्यशाळेसाठी धुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून भाजपाचे पदाधिकारी, आघाडी व मोर्चांचे प्रतिनिधी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. शनिवारी दिवसभर विविध विषयांवर तज्ज्ञ व वरिष्ठ नेत्यांकडून मार्गदर्शन करण्यात येणार असून कार्यकर्त्यांच्या शंकांचे निरसनही केले जाणार आहे.
दरम्यान, कार्यशाळेचा समारोप प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी आणि जनसंपर्क अभियानाबाबत महत्त्वपूर्ण दिशा देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
